।। ॐ अमलेश्वराय नमः ।।
नवनाथ-परंपरा
आदिनाथ सिद्ध । आदिगुरु थोर । त्यासी नमस्कार । भक्तिभावे ।। तयाचे पासून । शिवशक्ति बीज । लाधले सहज । मत्स्येंद्राते ।। मत्स्येंद्राने दिले । गोरक्षालागोन । गोरक्षे गहिनी । धन्य केला ।। गहिनीनाथे बोध । केला निवृत्तीसी । निवृत्ती उपदेशी । ज्ञानदेवा ।। ज्ञानदेव शिष्य । देव चुडामणि । पुढे झाले मुनी । गुंडाख्यादि ।। रामचंद्र महा । देव रामचंद्र । प्रसिद्ध मुनींद्र । विश्वनाथ ।। योगसार ऐसे । परंपरा प्राप्त । सद्गुरु गणनाथ । देई मज ।। स्वामी म्हणे झाले । कृतार्थ जीवन । सद्गुरु चरण । उपासिता ।। सद्गुरु स्वामी । कृपाळू समर्थ । सेवोनी कृतार्थ । अमलानंद ।।


आदिनाथांपासून जे शिवशक्तिबीज मत्स्येंद्रांना मिळाले ते महाराष्ट्रामध्ये गहिनीनाथांद्वारे निवृत्तीनाथांपर्यंत पोहोचले.ज्ञानदेवांनी या बीजाचे वटवृक्षामध्ये रुपांतर केले.हेच योगसार गणेशनाथ महाराजांतर्फे स्वामी स्वरूपानंद ( पावस ) यांना प्राप्त झाले. यांनीच विशेषे करून सर्व महाराष्ट्रामध्ये अविरतपणे, आयुष्यभर याचा प्रचार आणि प्रसार केला. नाथपंथाच्या ब्रह्मज्ञानरूपी वृक्षाला लागलेल्या सो|हं रूपी फुलाचा सुगंध महाराष्ट्रभर पसरविण्याचे श्रेय निःसंशयपणे स्वामी स्वरूपानंदांना जाते.त्यांचेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अंतरंग अधिकारी शिष्य स्वामी अमलानंदांनी तोच वारसा उत्तम रीतीने महाराष्ट्रातील पेण या गावी राहून आयुष्यभर निरलसपणे चालविला.या उभयतांच्या कार्याचा परिचय या वेबसाईटवर त्यांच्या ओवीबद्ध चरित्रात आणि अन्य वाङ्मयाद्वारे करून दिला आहे.
त्याच प्रमाणे स्वामी अमलानंदांचे एक शिष्य 'अमलसुत' तथा श्री.अनिल बेडेकर यांना स्वामीकृपेने स्फुरलेले गुरुगीता, अमृतबिंदूपनिषद, अष्टावक्र गीता आदि भाष्यवाङ्मयही येथे उपलब्ध आहे. तसेच स्वामी अमलानंद पब्लीक ट्रस्टतर्फे प्रकाशित होणारे त्रैमासिक अमल-संदेशचाही समावेश ट्रस्टच्या सहृदय परवानगीने येथे करण्यात आला आहे.
देश-विदेशातील परमार्थाची आवड असणाऱ्या व ज्यांना ती नाही त्या वाचकांमध्ये ती निर्माण व्हावी व नाथपंथाच्या तत्त्वज्ञानाची विचारधारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या प्रामाणिक हेतूने ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
वाचकांचा प्रतिसाद प्रार्थनीय आहे.
सद्गुरु प.पू.स्वामी प्रज्ञानंद, परमगुरु स्वामी अमलानंद व परात्पर गुरु स्वामी स्वरूपानंद यांना कृतज्ञतापूर्वक ही साईट सादर समर्पित आहे.
संपर्क :
मधुवंत बेडेकर (९८१९७५९९०२)
Email: madhuwant.bedekar@gmail.com